एसटी कर्मचाऱ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात राज ठाकरे राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती मनसे नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकरांनी दिली.
एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या महत्वाच्या मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच प्रतिनिधित्व करणाऱ्या एका मंडळाने आज राज ठाकरे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली व मदतीची मागणी केली.
या भेटीनंतर नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला व पक्षाची आणि राज ठाकरे यांची भूमिका मांडली. राज ठाकरे सरकारसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयावर बोलणार आहेत. तातडीने यावर ते चर्चा करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे स्वत: मदत करण्याच्या भूमिकेत आहेत. एकदा सरकारशी चर्चा झाल्यावर कामगारांशी काय बोलायचं ते राज ठाकरे बोलणार आहेत, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
मनसे एसटी कर्मचाऱ्यांसोबत आमचे वकील त्यांच्या सोबत कायम आहेत. यापुढेही एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत पक्ष असणार सोबत आमचे वकील देखील सोबत असणार आहेत. कायदेशीर लढाई सुरु आहे ते लढतील, असं नांदगावकर यांनी सांगितलं. एकूण २८ संघटनांनी मिळून हा संप जाहीर केला आहे. १ लाख कर्मचाऱ्यांनी सर्व संघटना बाजूला ठेवून संघटनाविरहीत ते त्यांचा लढा आहेत, असं त्यांनी सांगितलं .