गडमंदिरावर महाआरती व कलश पूजन
नागपूर: मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक गढाची माती श्री राम जन्मभूमी असलेल्या अयोध्या मंदिराच्या बांधकामात वापरली जाणार आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशीष जयस्वाल यांच्यासह शिवसैनिकांनी रामटेक गडाच्या मातीने भरलेल्या कलशाचे गडमंदिरावर पूजन केले. युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून रामटेक गडमंदिरावर महापूजा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी खासदार कृपाल तुमाने यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी आदित्य यांच्या दीर्घायुषी जीवनाची मंगल कामना केली. खासदार तुमाने म्हणाले, रामजन्मभूमी आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग होता. शिवसैनिकाच्या सहभागानेच अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराचे बांधकाम होत आहे. अयोध्या श्री रामाची जन्मभूमी तर रामटेक ही कर्मभूमी आहे.
पुरुषोत्तमाच्या पदस्पर्शनाने पावन झालेल्या रामटेकची माती अयोध्येच्या भव्य-दिव्य मंदिरासाठी वापरात यावी ही सर्वच शिवसैनिकांची इच्छा या निमित्ताने पूर्ण होत आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी रामटेकच्या सर्व शिवसैनिकांकडून ही भेट आहे.
यावेळी रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, जिल्हाप्रमुख राजू हरणे, जिल्हा प्रमुख व नासुप्रचे विश्वस्त संदीप इटकेलवार, युवा अधिकारी शुभम नवले, हर्षल काकडे, महिला प्रमुख वंदना लोणकर, अंजुषा बोधनकर, नरेश धोपटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.