मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहेत. केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे एनसीबीचे चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही निशाणा साधल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील एनसीबीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना राऊत म्हणाले की,’द्वारकेत ड्रग्ज सापडणं ही चिंतेची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना ज्यांनी पाव ग्रॅम वगैरे ड्रग पकडून जागतिक किर्ती-ख्याती प्राप्त केली, एक ग्रॅम, पाव ग्रॅम, अर्धा ग्रॅम त्यांनी या ३५० किलो ड्रग्जचा अभ्यास करावा.
यापूर्वी गुजरातमध्ये साडेतीन हजार किलो ड्रग्ज सापडले होते, साधारण २५ ते ३० हजार कोटी किमतीचे. त्याच गुजरातमध्ये हे साडेतीनशे किलो म्हणजे १०० कोटीच्या आसपास त्याची किंमत आहे. आता त्यामध्ये गुजरातमधली सिनेसृष्टी, काही श्रीमंतांची मुलं अडकली असतील त्या लोकांनी पाहावं आता. एनसीबीचे पथक नक्की तिथे काय काम करत आहे गुजरातमध्ये हे सुद्धा देशाला कळावं’, असेही राऊत म्हणाले.