जळगाव जिल्ह्यात आज एकाच दिवसात ५३ हजार लसीच्या मात्रा देण्याचा विक्रम नोंदवण्यात आला. लसीकरण मोहिमेतील आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. आज शनिवारी जिल्ह्यात ३१ हजार ३६६ लाभार्थ्यांना पहिला तर २१ हजार ७२३ लाभार्थ्यांना दुसरा डोस असा एकूण ५३ हजार ०८९ जणांना लसीच्या मात्रा देण्याचा विक्रम नोंदवण्यात आला.
जिल्ह्यात आतापर्यंत १२ लाख ६६ हजार ०५९ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा डोस आला आहे. यामध्ये ९ लाख २८ हजार ४२० जणांना पहिला डोस तर ३ लाख ३७ हजार ६३९ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्यातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. त्यात १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. तर १ मे ते ११ मेपर्यंत जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले.