पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप
केंद्र सरकारची अवस्था केविलवाणी असून त्यांनी भारतातील जनतेची अवस्थाही केविलवाणी करुन टाकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षांत देशातील गोरगरीब जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली केली. ही एकप्रकारे जनतेची लूट असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी मंगळवारी सातारा येथे हॉटेल प्राईडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना महामारी, इंधन दरवाढ, लॉकडाऊन, महागाई त्याचबरोबर अन्य विषयांवर पत्रकारांसमोर विवेचन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कारभारावर सडकून टीका करत असतानाच मोदींच्या ‘लसोत्सवा’वरही जोरदार निशाणा साधला.
भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याचा दावा मोदींनी केला असलातरी जगात आपला क्रमांक 144 वा आहे. याचाच अर्थ भारताच्यापुढे अजून 143 राष्ट्र आहेत. ही बाब सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यायला हवी, अशी कोपरखळीही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी मारली.
ते म्हणाले, मोदी सरकारच्या कार्यपध्दतीवर लोक नाराज असून त्यांच्या विरोधात लोक बोलत आहेत. गेल्या सात वर्षांत त्यांनी पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढ करुन लोकांच्या गोरगरिबांच्या खिशातून 23 लाख कोटी गोळा केले आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाला आल्यानंतर मोदी सरकार पॅनिक झाले. यानंतर इंधन दरवाढ थोडी कमी केली आहे.