नागपूर: प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेच्या रिले मशालीच्या सध्या सुरु असलेल्या प्रवासादरम्यान आज 2 जुलै रोजी ही मशाल महाराष्ट्रात येणार असून या पवित्र ज्योतीचे स्वागत करण्यासाठी राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी म्हणजे 3 जुलै 2022 रोजी ही मशाल गोवा राज्यात प्रवेश करेल.
नागपूर येथे पोहोचल्यानंतर ही बुद्धिबळ रिले मशाल शहरातील सुप्रसिद्ध झिरो माईल येथे साधारण 6 वाजता पोहोचेल. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आणि मशालीचे स्वागत करण्यासाठी खेळाडू, पारितोषिक विजेते आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित असतील.
ग्रँड मास्टर रौनक सधवानी, दिव्या देशमुख आणि संकल्प गुप्ता यांच्यासह विविध क्रीडा प्रकारांमध्ये नाव कमाविलेले राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्य बुद्धिबळ संघटना आणि नेहरू युवा केंद्राच्या सदस्यांसह जिल्हा पातळीवरील अधिकारी देखील या कार्यक्रमात भाग घेतील.
सर्व क्रीडा रसिकांसह या ऐतिहासिक मशालीला घेऊन निघालेली ही रॅली शहराच्या संविधान चौक, आकाशवाणी, महाराज बाग, विधी महाविद्यालय, रवी नगर चौक, वाडी टी केंद्र, हिंगणा जोड रस्ता किंवा जीएच रायसोनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, श्रद्धा पार्क, एमआयडीसी पोलीस स्थानक, छत्रपती स्क्वेअर आणि हिंगणा वाडी जोड रस्ता या भागांतून मार्गक्रमण करेल. सकाळी सुमारे आठ वाजता ती विमानतळावर पोहोचेल आणि तेथील मानवंदना स्वीकारून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराकडे रवाना होईल.
पुण्यात, ही मशाल हडपसर येथील अमनोरा टाऊनशिपमध्ये दुपारी 12 च्या सुमारास पोहोचेल. ग्रँड मास्टर अभिजित कुंटे, महिला ग्रँड मास्टर इशा करवाडे, राज्य क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरीया, पीएमआरडीएआयुक्त डॉ.सुहास दिवसे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार आणि राज्य बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील. महिला ग्रँड मास्टर इशा करवाडे हिच्याकडून बुद्धिबळ ऑलिंपियाड मशाल ग्रँड मास्टर अभिजित कुंटेकडे सोपविण्यात येईल. कार्यक्रमानंतर ही मशाल रस्ते मार्गाने राज्याची राजधानी मुंबईला जाण्यासाठी मार्गस्थ होईल.