पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता संजय राठोड यांनी राजीनामा देण्यामागचं कारण सांगितलं आहे.
‘मी एका प्रकरणा दरम्यान राजीनामा दिला आहे, आता परत मला मंत्रीपद द्यायचं की नाही हा संपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आहे. मात्र, मी माझ्या समाजासाठी काम करत राहणार’ असं राठोड म्हणाले. सोलापूर येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये संजय राठोड बोलत होते.
‘मी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. जेव्हा आरोप झाले अधिवेशन चालू देणार नाही असे म्हटले गेले. मी त्या पक्षात आहे. नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ काम करणारे म्हणून आहे. मन लावून ते प्रामाणिकपणे एकनिष्ठेने काम करत आहेत. त्यामुळे मला वाटलं आरोप झाले जे काही होईल ते पाहू. मी बाजूला राहतो करा तुम्ही चौकशी,’ असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नाव समोर आल्यानंतर संजय राठोड अडचणीत आले होते. या प्रकरणाशी संबंधीत ऑडिओ, व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर आपली बदनामी करण्यासाठी हे रचलेले कारस्थान आहे, चौकशीतून सगळं समोर येईल असे राठोड पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.