उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी योगी सरकारने एक सदस्यीय समिती गठीत केली असून या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांकडे सोपविण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव हे या घटनेची चौकशी करणार आहेत. ही चौकशी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.
३ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्र्याच्या वाहनांच्या ताफ्यात चिरडून चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने या शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे देशभरातून प्रचंड संताप व्यक्त होत असल्याने योगी सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
७ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज सर्वोच्च न्यायालयात देखील या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सर्वेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्वत:हून दखल घेतली आहे. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने जाहिर केले आहे.