आपल्या भारताचा शेजारील देश सध्या मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. या परिस्थितीमुळे आता श्रीलंकेतील लोक रस्त्यावर उतरले आहेत. आर्थिक संकटामध्ये सर्वसमान्यांचे हाल होत असल्याने सरकारविरोधात निषेध नोंदवण्यासाठी लोकांनी रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
दि.३१ मार्च रोजी रात्री उशीरा स्थानिकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी करत राष्ट्रपतींनी राजानीमा द्यावा अशी मागणी करण्यात आली. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते. या नागरिकांना रोखण्यासाठी सध्या कर्फ्यु लावण्यात आला आहे. तर या प्रकरणी ४५ जणांना अटक करण्यात आली आहे.
कोलंबोमध्ये आंदोलन करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आणि त्यातूनच हिंसा सुरु झाली. आंदोलनकर्त्यांनी त्यांना रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांवर बाटल्या आणि दगड फेकण्यास सुरुवात केली. लोकांनी एका बसला आग लावल्याचेही समोर आले आहे. राष्ट्रपतींच्या घरासमोर हा सारा गोंधळ सुरु असताना ते स्वत: मात्र घरी नव्हते.