रशियाने युक्रेनमधील दोन शहरांसाठी तात्पुरती युद्धविरामाची घोषणा केली आहे. दक्षिण-पूर्व युक्रेनमधील मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांमध्ये तात्पुरते युद्ध थांबवले जात आहे. तसेच नागरिकांसाठी मानवतावादी कॉरिडॉर खुला केला जात असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
शहरांमधून बाहेर पडण्यासाठी मोकळीक दिली आहे, परंतु आम्ही युक्रेनकडून याची पुष्टी केलेली नसल्याचे रशियाने म्हटले आहे. मारियुपोल हे एक युक्रेनमधील प्रमुख बंदर शहर आहे. अनेक दिवसांपासून रशियन सैन्याने याला वेढा दिला आहे. वोल्नोवाखा येथे रशिया आणि युक्रेन सैन्यांमध्ये जोरदार लढाई सुरु आहे.
मारियुपोल शहराची रशियन सैन्याने नाकाबंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर मारियुपोलच्या महापौरांनी नागरिकांना शहर सोडण्यासाठी परवानगी देण्याचे आवाहन केले होते.