संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने शनिवारी होणारी “सार्क’ गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याचा आग्रह पाकिस्तानने धरला होता.
अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा सहभाग असलेल्या “सार्क’ मध्ये पाकिस्तानव्यतिरिक्त अन्य कणत्याही देशाने तालिबानच्या सहभागाबद्दल आग्रह धरला नाही. अफगाणिस्तानच्यावतीने संयुक्त राष्ट्रातील अफगाणी प्रतिनिधींना सहभागी करून घेता आले असते. मात्र तालिबानच्या सहभागाबद्दल एकमत न होऊ शकल्याने ही बैठकच रद्द करण्यात आली.
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने “सार्क’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होत असते. या बैठकीच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री समोरासमोर असतात. गेल्यावर्षी आभासी पद्धतीने झालेल्या अनौपचारिक बैठकीमध्ये सीमेपलिकडील दहशतवाद, दहशतवाद्यांच्या संलग्नतेला रोखणे आणि व्यारी संबंधांना अटकाव करण्याच्या आव्हानांचा उल्लेख परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी केला होता. त्यांचा सगळा रोख पाकिस्तानच्या दिशेनेच होता.