पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संजनाची स्तुती
नागपूर : इंग्लंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेली उपराजधानीतील युवा ट्रायथलॉन खेळाडू संजना सुशील जोशी हिची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्तुती केली आहे.
इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मोदींनी बुधवारी भारतीय खेळाडूंना ‘मोटिव्हेट’ केले. यावेळी खेळाडूंना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी संघात समावेश असलेल्या १६ वर्षीय संजनासह अन्य युवा खेळाडूंचा विशेषत्वाने उल्लेख केला. ते म्हणाले, राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जात असलेला भारतीय संघ खास असून, अनुभव आणि ऊर्जा यांचा अद्भुत संगम आहे. हे १७-१८ वर्षांचे खेळाडू देशाचे भविष्य असल्याचे सांगून, ते नक्कीच स्पर्धेत भारताचे नाव रोशन करतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तुम्ही सर्व खेळाडू केवळ खेळातच नव्हे, तर जागतिक व्यासपीठावर ‘न्यू इंडिया’चे प्रतिनिधित्व करणार असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रकुल स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान बरमिंघम येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेत संजना स्प्रिंट डिस्टन्स ट्रायथलॉनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत निवड झालेली ती नागपूरची पहिली महिला व माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदीप गंधेनंतर दुसरी खेळाडू ठरली आहे. तीन क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या ट्रायथलॉनमध्ये खेळाडूला ७५० मीटर स्विमिंग, त्यानंतर २० किमी सायकलिंग आणि ५ किमी रनिंग करावे लागणार आहे. सोमलवार निकालसची विद्यार्थिनी असलेली संजना माइल्स एन मायलर्स एंडयुरन्स स्पोर्ट्स अकादमीचे प्रशिक्षक डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.