पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईच्या दौऱ्यावर आल्या त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून होत होती. या बैठकीमुळे देशातील राजकीय समीकरणे बदलतील असे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.
ममता बॅनर्जी यांनी मुंबईत आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत व आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर येथील उद्योगपतींशी देखील त्यांनी संवाद साधला. शरद पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकी नंतर पत्रकारांशी देखील त्यांनी संवाद साधला. शरद पवार आणि ममता बॅनर्जी दोघांनीही आपल्या भूमिका यावेळी स्पष्ट केल्या. मात्र भाजप नेत्यांना ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा आवडलेला दिसत नाहीये. यावर मात्र संजय राऊत यांनी आक्षेप घेणाऱ्यांवर चांगलाच टोला लगावला आहे.
ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यासाठी आल्या असून शिवसेना त्यांना मदत करत असल्याचा आक्षेप भाजपा नेत्यांनी घेतला होता. यावरुन संजय राऊतांनी टीका केली असून मुंबईवर एवढं प्रेम आहे तर मग इतरवेळी कुठं जातं, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. चार पाच वर्षांपूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल इथे आल्या होत्या. आल्यानंतर त्यांनी मुंबईची बदनामी सुरु केली होती. काय इथले रस्ते, खड्डे. उद्योगपतींनो गुजरातला चला, मुंबईत काय ठेवलं आहे? ही त्यांची भाषा होती, तेव्हा यांना मिरच्या का झोंबल्या नाहीत? तेव्हा तोंडाचा मुरंबा का झाला होता?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.