महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा 35 वा पदवीदान समारंभ गुरुवारी (दि.२८) आयोजित करण्यात आला आहे. कृषि विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार सभागृहामध्ये ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी असणार आहेत.
यावेळी कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषिमंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्र सिंह राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, ते दीक्षान्त भाषण करणार आहेत. यावेळी या समारंभासाठी विद्यापीठाचे विद्यापीठ कार्यकारी आणि विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार आणि रस्ते, वाहतूक आणि परिवहन खात्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.