पुणे: आज मुख्यमंत्री पुणे दौ-यावर आहेत. संजय राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावण्यात आली. तपास करताना तपास अधिकाऱ्यांना संजय राऊत यांच्या घऱी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली होती. त्यापैकी दहा लाखांच्या नोटांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आढळून आल्याची माहिती समोर आली होती.
एकनाथ शिंदे यांच्याकडे पुण्यात प्रसारमाध्यमांनी प्रश्न उपस्थित केले. संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या पैशांवर तुमचं नाव कसं आलं यासंबंधी चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले “माझी चौकशी करण्यापेक्षा, ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी संजय राऊतांची चौकशी सुरु आहे. त्यातून लवकरच सत्य समोर येईल, असे सांगत त्यांनी त्यावर जास्त भाष्य करणं टाळत चिडीचूप असण्याची सावध भूमिका घेतली.
ईडीच्या पथकाने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर छापेमारी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या घराबाहेर केंद्रीय राखीव पोलीस दलही (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. याशिवाय त्यांच्या दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात आली. तब्बल नऊ तास चाललेल्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांना राऊतांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटांवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. त्यावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख करण्यात आला होता.