शिवसेना नेते संजय राऊत आज बुधवारी गोवा दौऱ्यावर जात आहेत. शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याने आपण तेथे जात असल्याची माहिती राऊत यांनी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही तिकडे प्रचारासाठी गेले होते. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, असे ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
‘महाराष्ट्र आणि गोव्याची संस्कृती जवळपास सारखी आहे. ते महाराष्ट्राच्या जवळचे राज्य आहे. पण, आता तिथे पश्चिम बंगालमधील तृणमुल काँग्रेसने प्रवेश केला आहे. मग, आम्ही का नाही लढणार?. गोव्यातील भाजप सरकार नवनवीन थापा मारतात. त्यांना मतदारांनी अद्दल घडवणे आवश्यक आहे. तो धडा शिवसेना पक्ष शिकवू शकतो. गोव्यात आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचू. तिथे संघटनाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
शिवाय ‘महाराष्ट्रात आम्ही कुठेही फोडाफोडी केली नाही. किमान समान कार्यक्रम ठरवून तीन पक्ष एकत्र आलो. त्यामुळे गोव्याची तुलना महाराष्ट्रासोबत होऊ शकत नाही. कारण, गोव्यात कोण कोणासोबत कधी जाईल हे सांगता येत नाही. गोव्यातील जनता एका आमदाराला मत देते. निवडून आल्यानंतर तोच आमदार दुसऱ्या पक्षात जातो. गोव्यातील हे फोडाफोडीची राजकारण कुठंतरी थांबवायला हवे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. गोव्यात शिवसेनेची कोणासोबत आघाडी झाली तर ठीक आहे. नाहीतर शिवसेना एकटी लढेल’ असे राऊत यांनी सांगितले.