महाविकास आघाडीतील गृहकलह चव्हाट्यावर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाविरोधात नाराजी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत सध्या वेगवान घडामोडी सुरु आहेत. महाविकास आघाडीत झालेल्या बिघाडीमुळे सध्यातरी ‘गृहकलह’ चव्हाट्यावर आल्याचे चित्र असून, शिवसेनेची गृहमंत्रिपदावर करडी नजर असल्याचे सूत्रांकडून समजते.
या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष भाजपाविरोधात मवाळ भूमिका घेत असल्याची नाराजी जाहीर केल्यानंतर नेत्यांमध्ये भेटीगाठी सुरु आहेत. शिवसेनेचा मूळ आक्षेप गृहखात्यावर असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा सुरु असतानाच दिलीप वळसे पाटील उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी पोहोचले होते. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. दुसरीकडे दिलीप वळसे पाटील यांनीही पत्रकार परिषद घेत सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, “या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत आधीच खुलासा केला आहे. अशाप्रकारची कुठलीही नाराजी नाही. नाराजी असण्याचा प्रश्न नाही. आम्ही परस्परांना विश्वासात घेऊनच सगळे निर्णय घेत असतो”.
यावेळी त्यांना शिवसेना गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मला तरी तसं वाटत नाही. पण उद्या मुख्यमंत्री जर तुम्हाला भेटले तर त्यांनाच विचारा”.
मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण –
गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे. “अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून, माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.