मुंबई: राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज दि ५ जून रोजी भाजपच्या (BJP) दोन बैठका पार पडल्या. या बैठकीत राज्य प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह चंद्रकांत पाटील, आशिष शेलार तर गिरीश महाजन, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि देवेंद्र फडणवीस ऑनलाईन हजर होते. या बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांना प्रसार माध्यमांशी संवाद साधला. रणनिती ठरली असून शिवसेनेचा हा ‘ संजय’ जिंकणार नाही, असा अप्रत्यक्ष निशाणा त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर साधला.
आशिष शेलार म्हणाले की, अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. तसेच, राज्यसभेसाठी सर्व रणनिती तयार आहे. भाजपचा तिसरा उमेदवार जिंकणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, संजय राऊत यांचे बोलणे हे बालिशपणाचे आणि पोरकटपणाचे आहे. त्यांना कदाचित पराभव दिसत असेल त्यामुळे ते असे बोलत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार होऊ नये. यासाठी आमादारांना सुरक्षित स्थळी ठेवणार असल्याचे म्हंटले होते. यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, कोल्हापूरातील त्यांचे आमदार त्यांनी व्यवस्थित सांभाळले तरी खूप आहे. ही वेळ त्यांच्यावर का येते. आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचे पाप त्यांनी केले आहे. लोकशाहीत आजवर असे कधी झाले नव्हते. जे तबेल्यात राहातात त्यांनाच असे स्वप्न पडतात. त्यांनी जरा घरात राहाणे सुरू करावे, अशा शब्दांच त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.