मुंबई – एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय नाटकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिंदे गटातील आमदार व शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यातील शाब्दिक चकमक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत बंडखोर आमदारांवर टीकास्त्र करायला सुरुवात केली आहे. तसेच, त्यांच्या दौऱ्याला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने बंडखोर आमदारांचे धाबे दणाणले आहेत.
आदित्य ठाकरे यांची सुरुवात जोमात?
राज्यात कधी नव्हे असं राजकीय नाट्यांतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी ने पाहायला भेटलं. पाच वर्ष ठामपणे चालणार असं भाकीत करणार महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच गडगडलं. यामध्ये एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा असून, आपल्यासोबत ४० बंडखोर आमदारांना फोडण्यात त्यांना मोठे यश आलं. परंतु, हे फोडाफोडीचे राजकारण ठाकरे परिवाराला अद्याप पटलेल नसून हे दुःख पेलवण ठाकरे परिवाराला तितकं सोपं नाही. मात्र, जे शक्य होईल ते सर्व करून या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली असून, महाराष्ट्रातील ३ दिवस केलेल्या शिवसंवाद यात्रेतून त्यांनी या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
आदित्य यांच्या यात्रेला, सभेला, भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद – आदित्य ठाकरे यांनी ‘शिवसंवाद’यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर दौरे केले. या दौऱ्यामध्ये त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत ज्या ज्या ठिकाणी बंडखोर आमदारांनी बंड पुकारले आहे. त्या त्यांच्या मतदारसंघांमध्येच त्यांना उघडपणे चॅलेंज दिली आहे. औरंगाबादमध्ये बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील बिडकीन येथे आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला तुफान गर्दी बघायला भेटली. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर शाब्दिक हमला सुद्धा मोठ्या प्रमाणात केला. आदित्य ठाकरे यांच्या सभेला रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी पाहायला भेटली. त्यांच्या या सभेने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारू लागलं आहे. आदित्य ठाकरे यांच्यात सभेला व भाषणाला मिळणारा प्रतिसाद याने शिंदे गटातील बंडखोर आमदारांची चिंता नक्कीच वाढणारी आहे.