महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी परवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर शिवसैनिकांत असलेला असंतोष उफाळून येत आहे. अनेकांनी सेना सोडण्याची तयारी चालवली असल्याची माहिती आहे. अशात शहरातील सेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांना विचारणा झाली आहे. निरोप पाठवून त्यांना मुंबईला बोलावण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेत मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेखर सावरबांधे यांनी शिवबंधन तोडल्याने शिवसेनेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेची मुंबईतून दखल घेण्यात आली असून नागपूरमधील उफाळून आलेल्या असंतोषाचे कारण काय, अशी विचारणा माजी पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सावरबांधे यांच्यापाठोपाठ अनेक पदाधिकारी सेना सोडण्याच्या तयारीत आहेत. यात एका नगरसेवकाचाही समावेश असल्याचे कळते. स्थानिक नेत्यांमुळे अनेक पदाधिकारी अस्वस्थ आहेत. मोठी पदे दिली तर त्यांना निर्णय घेण्याचे अधिकारसुद्धा देण्यात आले नाही. काहींना मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी बोलण्यासही मनाई करण्यात आल्याचे समजते. शिवसेनेत प्रवेश करून फसलो, अशी भावना आता अनेक पदाधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षणी शिवसेनेत मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.