राज्यात कोरोना कालावधीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्यात; पण औरंगाबाद शहरातून समोर आलेल्या बातमीने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधील एका कोविड रूग्णालयात कोरोनाबाधित रस्त्यावर मोकाट फिरत आहेत आणि 10 हजार रूपयांच्या बदल्यात चक्क बोगस कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हा धक्कादायक प्रकार घडला आहे औरंगाबाद महापालिकेच्या मेलट्रॉन कोविड रूग्णालयात. औरंगाबादमधील एका उद्यानाबाहेर आरटीपीसीआर टेस्ट सुरू होती. यावेळी दोन तरूण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. त्यांना कोविड रूग्णालयात उपचारासाठी दाखल व्हा, असे सांगण्यात आले. यावेळी त्यांनी त्यांच्या ऐवजी चक्क दोन तरूणांना बोगस रूग्ण बनवत रूग्णालयात पाठवले.
जालना येथुन कामासाठी औरंगाबादमध्ये आलेल्या दोन तरूणांना एका दिवसासाठी 10 हजारांचं आमिष दाखवत त्यांना कोविड रूग्णालयात पाठवलं. कोविड रूग्ण म्हणून आपल्यावर उपचार सुरू असल्याची बाब त्या तरूणांच्या लक्षात येताच त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. या तरूणांनी सुटकेसाठी गोंधळ केल्यानंतर हा सगळा प्रकार रूग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आला.
या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद महापालिकेने पोलिसांकडे धाव घेतली आणि रात्री उशिरा या घटनेविरोधात तक्रार दाखल केली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असला तरी ते खरे दोन कोरोनाबाधित रूग्ण अजूनही फरार आहेत. त्यामुळे खऱ्या कोरोनाबाधित रूग्णांना शोधून काढण्याचं आव्हान आता औरंगाबाद पोलिसांसमोर आहे.