केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाचे (आय अँड बी) ट्विटर अकाउंट हॅक झाल्याच्या प्रकार बुधवारी घडला. हे खाते हॅक करून त्याचे नाव एलन मस्क असे ठेवण्यात आले होते व त्यामागे माशाचे छायाचित्र लावण्यात आले होते. विशेष म्हणजे हे अकाउंट हॅक करून यावरून टीवीट्स देखील करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर खाते हॅक करण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. हे प्रकरण ताजे असतानाच माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाचे खाते हॅक करण्यात आल्याने सोशल मीडिया खात्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘आय अँड बी’ चे खाते लगेचच रिस्टोअर करून परक्यांनी केलेले ट्विटस हटविण्यात आले.
ज्या लोकांनी पंतप्रधानांचे खाते हॅक केले होते, त्यांनीच हे खाते हॅक केल्याचा संशय आहे. याचे कारण म्हणजे पंतप्रधानांचे खाते हॅक केल्यानंतर जो मजकूर ट्विट करण्यात आला होता, तसाच मजकूर आय अँड बी च्या सोशल मीडियावर ट्विट करण्यात आला होता. याआधी आयसीडब्ल्यूए, आयएमए आदी संस्थांचे खाते देखील हॅक झाले होते.