नागपूर: जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन विद्युतीकरणासह डिजीटलायझेशन करुन ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’ करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. त्यासोबतच सर्व शाळा सौर ऊर्जेवर करा, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. जिल्हा नियोजन कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवनात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
या जिल्हा नियोजन आढावा बैठकीस खासदार कृपाल तुमाने, आमदार अभिजीत वंजारी, राजु पारवे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधिक्षक विजय मगर, कार्यकारी समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
डिजीटलायझेशनमुळे पोलीस स्टेशनमध्ये वाय-फाय सर्व ठिकाणी राहील. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेच्या समस्या निवारणासाठी होईल. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण पोलीस विभागाने द्यावे. सौर ऊर्जेचे उपकरण सर्व शाळांवर कार्यान्वित करा. यामुळे विद्युत बचत होईल. पोलीस व शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
शहरी भागासोबतच ग्रामीण भागावर जास्त भर द्या, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रशासकीय सेवापूर्व स्पर्धा परीक्षा केंद्राचे डिजीटलायझेशन करुन त्याचा लाभ तेथील विद्यार्थ्यांना द्या. जास्तीत जास्त विद्यार्थी युपीएसी व एमपीएससी स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण व्हायला हवेत, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात 7 पैकी नागपूर येथील केंद्र प्रथम क्रमांकावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावर पालकमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाच्या तुलनेत राज्याचा वाटा किती आहे, राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा वाटा किती आहे याचा आढावा घ्या. त्यानुसार प्रस्ताव सादर करा. या सेंटरमधील वसतिगृह सर्व सोयीयुक्त करा, अभ्यासासाठी वातावरण निर्मितीसह चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. जिल्ह्यात विधानसभा निहाय सेंटर चालू करा व ते मुख्य सेंटरला जोडा व वैचारिक पध्दतीत बदल घडवून आणा, असेही पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले.