राज्यातील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एकामागे एक गंभीर आरोप करत असून त्यांनी विविध प्रकरणांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, शिवसेना खासदार भावना गवळी आदींसह एकूण ११ जणांवर गंभीर आरोप करत ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करण्यासह किरीट सोमय्या यांनी पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत.
दरम्यान, आता किरीट सोमय्या यांनी आणखी एक राजकीय बॉम्ब टाकला आहे. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी ईडीच्या यादीतील १२ व्या व्यक्तीचे नाव जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सोमय्या यांचे पुढील टार्गेट असल्याचं आता जाहीर झालंय. किरीट सोमय्या यांनी हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.