अभ्यासासाठी वापरले रेल्वेचे वाय फाय
रेल्वे स्टेशन वर हमालाचे काम करत रेल्वे स्टेशनवरील मोफत वायफायचा वापर करत श्रीनाथ ने UPSC अभ्यास करून परीक्षेत यश मिळविले आहे. त्याबद्दल सर्व देशातून त्याचे कौतुक होत आहे. इच्छाशक्ती खंबीर असेल आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याची तयारी असेल तर कोणतीही व्यक्ती सर्वात मोठे ध्येय गाठू शकते. मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर तुम्ही मात करू शकता. मूळचा केरळचा असलेल्या श्रीनाथचे यश हे त्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीचे उदाहरण आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करणाऱ्यांसाठी ही मोठी शिकवण आहे.
श्रीनाथची आयएएस अधिकारी होईपर्यंतची कहाणी खूप रंजक आहे. आयएएस होण्यापूर्वी तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हमाल म्हणून काम करायचा. कौटुंबिक खर्च भागवण्याइतपत मिळकत नसल्याने तो दुहेरी शिफ्टमध्ये काम करू लागला. तरीही अडचणी कायम राहिल्या पण त्याने मन खचू दिले नाही. प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे स्वप्न पक्के होते. पण त्या अभ्यासासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. अशाही परिस्थितीत त्याने जिद्द सोडली नाही.
कौटुंबिक परिस्थितीमुळे श्रीनाथची जास्त फी भरण्याची ऐपत नव्हती. त्याने कसेतरी स्मार्टफोनची व्यवस्था केली. पण रिचार्जसाठी पैसे नव्हते; म्हणून त्याने रेल्वे स्टेशनवरील मोफत वायफायचा वापर करून तयारी सुरु केली. अथक मेहनतीने श्रीनाथने केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. पण त्याचे ध्येय त्याहून मोठे होते. काही काळानंतर श्रीनाथने आयएएसची तयारी सुरू केली आणि चौथ्या प्रयत्नात यपीएससीची परीक्षा दिली आणि IAS झाला. त्याच्या अथक प्रयत्नास मानाचा सलाम.