राज्यात मागील ब-याच दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेत. यातच आता शिवसंग्राम, पुणे जिल्हा व मराठा क्रांती संघर्ष मोर्चा यांचे वतीने, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यासाठी दि.२ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेस शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, प्रदेश सचिव शेखर पवार, युवकाध्यक्ष सचिन ननावरे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद शिंदे, सा.न्या. प्रदेश उपाध्यक्ष कल्याणराव अडागळे आदी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर नाकारल्या नंतर समाजात मोठ्या प्रमाणात निराशेची भावना तसेच संताप निर्माण झाला आहे.
करोडोंचे मोर्चे काढून, आंदोलने करून, गुन्हे अंगावर घेऊन, अनेकांनी बलिदान देऊनही पदरी निराशाच पदरी पडली. जो मा.न्या.गायकवाड आयोग उच्च न्यायालयात टिकू शकतो तोच आयोग सर्वोच्च न्यायालयात टिकू शकत नाही याचे समाजात वेदनायुक्त आश्चर्य व्यक्त होतंय. सर्वोच्च न्यायालयात समाजाची बाजू समर्थपणे मांडण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले अशी सार्वत्रिक भावना आहे. याला जबाबदार, राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेच असल्याने त्यांची तातडीने उपसमिती वरून हकालपट्टी करावी ही प्रमुख मागणी असणार आहे असे शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे यांनी सांगितले.