पेट्रोलच्या किंमती तर अमेरिका ठरवते; रावसाहेब दानवे
आपल्या विनोदी आणि टोले मारण्याच्या भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर अमेरिका ठरवते, केंद्र सरकार काही रोज या किंमती कमी जास्त करत नाही, त्यामुळे सरकारला यासाठी दोषी ठरवणे योग्य नाही, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने काढलेल्या महागाईच्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या अजब वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काँग्रेसने महागाईविरोधात काढलेल्या मोर्चावर त्यांनी नुकतीच औरंगाबादमध्ये प्रतिक्रिया दिली. शहरातील भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दानवे म्हणाले, इंधनाच्या वाढत्या दरांवर यांनी मोर्चे काढले. पण काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती जागतिक बाजारपेठेशी जोडल्या आहेत.
केंद्र सरकार रोज किंमती वाढवण्याचे काम करत नाही. केंद्र सरकार रोज किंमती खालीवर करत नाही, पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते. त्यामुळे इंधन दरवाढीचा दोष केंद्र सरकारला देणे योग्य नाही. असे असतानाही आपण केंद्र सरकारने आपला कर कमी केला. पण राज्य सरकार राज्यातील कर कमी करण्यास तयार नाही. हा देश केवळ केंद्र सरकारच्या पैशांवर चालतो. राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून काहीही निर्णय घेत नाहीत, अशी टीकाही दानवे यांनी केली.