मुंबई: राज्यात मविआ सरकारमधील आमदारांनी बंडखोरी करीत, गैरमार्गाचा अवलंब करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले. अशा परिस्थितीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शिवसेनेची भूमिका अनाकलनीय असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
शिवसेना हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. पण भाजपाच्या उमेदवाराला पाठिंब्याचा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केली नाही, असेही थोरात यांनी सांगितले. राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणाकरिता सुरू असलेला हा संघर्ष आहे. महिला, पुरुष किंवा आदिवासी-बिगर आदिवासी अशी लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल घेतलेल्या बैठकीत मुर्मू यांना पाठींबा देणार नसल्याची भूमिका घेत ठाम होते. परंतु दि १२ जुलै रोजी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधत भाजपाच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला. कुणाच्या दबावाखाली निर्णय घेतला की भाजपाशी सलगी करण्याचा मानस आहे, अशा एक ना अनेक चर्चेस उधाण आले आहे.