सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील 12 आमदारांचे निलंबन रद्द करून ठाकरे सरकारला मोठा झटका दिला आहे. यावर ‘त्या’ 12 आमदरांपैकी एक असलेले अतुल भातखळकर यांनी हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विजय आहे अशी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अतुल भातखळकर म्हणाले, ” सर्वोच्च न्यायालयाने आज 12 निलंबित आमदारांविषयी दिलेला निर्णय हा लोकशाहीचा विजय असून पुन्हा एकदा महाभकास आघाडी सरकारचे त्यांच्या हुकूमशाही कारभाराला आणि प्रवृत्तीच थोबाड फोडणारा हा निर्णय आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले,” आम्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदार संघातल्या लोकांना न्याय देणारा हा निर्णय आहे. केवळ आणि केवळ आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून अन्यायाने, गैर पद्धतीने, बेकायदेशीर पद्धतीने आम्हाला निलंबित करण्यात आले होते. ते सुद्धा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता. त्यामुळे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मोडून काढला. या निर्णयावर आपले निकालपत्र दिले. याच्या बद्दल लोकशाहीचे आभार मानतोच. तसेच हा निर्णय लोकशाहीचा विजय आहे. हा आमच्या मतदार संघातल्या लोकांचा विजय आहे,” असे म्हणत अतुल भातखळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.