भारतातील प्रमुख पोलाद कंपनी टाटा स्टीलने रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात टाटा स्टीलने म्हटले आहे की, रशियासोबत व्यवसाय करणे ते बंद करणार आहे. बुधवारी याबाबतची माहिती भारतीय स्टील कंपनीने दिली.
बुधवारी भारतीय पोलाद क्षेत्रातील दिग्गज टाटा स्टीलची युरोपीयन शाखेने सांगितले की, ते रशियासोबत व्यवसाय करणे थांबवत आहे. एका निवेदनात टाटा स्टीलने म्हटले की, टाटा स्टीलचे कोणतेही काम किंवा कर्मचारी रशियामध्ये नाहीत. आम्ही रशियासोबतचा व्यवसाय बंद करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. भारत, यूके आणि नेदरलँड्समधील कंपनीच्या सर्व स्टील उत्पादन साइट्सने रशियावरील त्यांचे अवलंबित्व संपवण्यासाठी कच्च्या मालाचा पर्यायी पुरवठा केल्याचे टाटा स्टीलने सांगितले आहे.
3 मे रोजी कंपनीच्या शेअर्सचे वितरण करण्याच्या प्रस्तावावर टाटा स्टीलचे संचालक मंडळ विचार करणार आहे. याबाबतची माहिती कंपनीने नुकतीच दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील आर्थिक निकालांवर 3 मे रोजी होणाऱ्या बैठकीत संचालक मंडळ विचार करणार आहे. कंपनीने सांगितले की, बैठकीत संचालक मंडळाने ठरवलेल्या पद्धतीने 10 रुपये मूल्याचे शेअर्स विभाजित करण्याचा विचार केला जाईल. यासाठी नियामक मंजुरींशिवाय भागधारकांचीही मान्यता घेतली जाणार आहे. बैठकीत संचालक मंडळ 2021-22 या आर्थिक वर्षासाठी लाभांशाची शिफारस देखील करू शकते.