नागपूर: राज्यात आरोग्यमंत्र्यानी कोरोनाचे कडक निर्बंध हटवून मास्कसक्ती जाहीर केल्यानंतर चौथ्या लाटेचा प्रश्न मिटल्यात जमा असून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे १२ ते १४ वर्ष वयोगटातील लसीकरणाचा जोर मागील काही दिवसापासून कमी झाला आहे. हे तितकेच खरे असले तरी आरोग्य विभागही फारसे मनावर घेत नसल्याने, लसीकरण प्रक्रीया थंडबस्त्यात असल्याचे सर्वत्र चित्र आहे.
राज्यात वय वर्ष १२ ते १४ या वयोगटाचे लसीकरण १६ मार्चपासून सुरू झाले. परंतु अनेक आरोग्य केंद्रात लसीचा पुरवठा उपलब्ध नसून, शाळेतच लसीकरण मोहिम राबविणार असल्याचे महिनाभरापासून सांगण्यात येत होते. काही जिल्ह्यातील शाळामध्ये मोहिम यशस्वीपणे राबविल्या गेली. परंतु आता वेग मंदावल्याचे दिसून येत आहे.
खरे पाहता या वयोगटासाठी लसीकरण खुले झाल्यानंतर लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते, परंतु करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे या वयोगटाचे लसीकरण करून घेण्यास पालकांनी पाठ फिरवली आहे. राज्यभरात सुमारे ३० टक्के बालकांचे लसीकरण झाले आहे. लवकरच या बालकांचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरणही आता १६ एप्रिलपासून सुरू होईल, परंतु त्या तुलनेत प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काय करावे असा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यांसमोर उभा राहिला आहे. शाळांमध्ये लसीकरण मोहिम राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेला ‘खो’ देणे गरजेचे झाले आहे.
नागपुरात १२ ते १४ वयोगटाचे लसीकरण सुरू होऊन बरेच दिवस उलटून गेले तरी या लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. हिंगणा तालुक्यात कोणत्याही सरकारी निमसरकारी रूग्णालयात या वयोगटासाठीची लस उपलब्ध नसल्याचे समजते. राज्यभरात ३० टक्के बालकांचे लसीकरण झाले असून सर्वात कमी म्हणजे अवघे ७ टक्के लसीकरण मुंबईत झाले आहे. ही पालकांची चिंता वाढवणारी बाब असून आरोग्य विभागाने यासाठी ठोस पावले उचलणे महत्वाचे आहे.