देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना दुसऱ्या बाजूला लसीकरण मोहीम देखील जोरात राबविण्यात येत आहे. यातच आता राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचं देखील सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत असे पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे त्यामुळे केंद्रसरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.