सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना फटकारले
सर्वोच्च न्यायालयाने फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना त्यांचा ठावठिकाणा उघड करण्यास सांगितले आहे. तसेच ते देशाच्या किंवा जगात कोणत्या भागात आहेत हे सांगितल्यानंतरच अटकेपासून संरक्षणासाठी सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी होईल, असं म्हणत पुन्हा फटकारले आहे.
दरम्यान, काल मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने परमबीर सिंह यांना फरार गुन्हेगार घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी दिली आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. फरार घोषित करण्यात आल्यानंतर आता त्यांना ३० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या कालावधीत सिंह जर न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे.
परमबीर सिंह हे भारतात आहेत की, भारताबाहेर आहेत याबाबतचा तपशील द्यावा, मगच त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. परबीर सिंह यांची बाजू मांडणाऱ्या वकिलालाही सर्वोच्च न्यायालयाने विचारले की याचिकाकर्ते असलेले परमबीर सिंह हे सध्या कुठे आहेत? या प्रकरणातील पुढील सुनावणी ही २२ नोव्हेंबरला होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मुंबईच्या किल्ला कोर्टाने परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं. गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. आता न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासह रिजाय भाटी आणि विनय सिंह यांना देखील फरार घोषित केलं आहे.
परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप करत लेटरबॉम्ब टाकला होता. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला तर परमबीर सिंह पसार झाले होते. याच प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक देखील झाली.
परमबीर सिंह यांच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगासमोर परमबीर सिंह हजर झाले नव्हते. देशमुख यांना या प्रकरणात ईडीने अटक केली. त्यानंतर लगेचच परमबीर सिंह यांनी चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. देशमुख यांच्याविरुद्ध पत्राच्या पलीकडे कोणताही पुरावा नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
परमबीर यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे. राज्य सरकारनेही या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांचा एकसदस्यीय चौकशी आयोग सरकारने नेमला आहे. अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंह हे कोर्टात हजर झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ठाणे आणि मुंबई कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहेत. तसेच ते देशाबाहेर गेल्याचा आरोपही केला जातोय.