कोरोना विरोधातील लढाईचा देशासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरण्याची शक्यता असून याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 99 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहते, तर आज लसीकरणाचा ऐतिहासिक 100 कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 100 कोटी लसींचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुद्धा केली आहे.
कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला देशात 16 जानेवारीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 1 फेब्रुवारीला एक कोटी डोस देण्यात आले. 15 जून रोजी 25 कोटी डोस पूर्ण झाले तर 6 ऑगस्ट रोजी 50 कोटी डोस पूर्ण झाल्यानंतर 13 सप्टेंबरला 75 कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाला तर काल मंगळवारी, 19 ऑक्टोबरला 99 कोटीहून अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने देशातील लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचे यश साजरे करण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लाँच केले जाणार आहे. 100 कोटींचा आकडा लसीकरणाने ओलांडताच हे थीम साँग देशभरातील सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे.