केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी गाड्यांना भारतीय वाद्यांच्या आवाजातील हॉर्न बसविणार असल्याचे सांगितलं होते. याबाबत लवकरच कायदा करणार असल्याची माहिती गडकरी यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. वाहनांना भारतीय वाद्यांचे हॉर्न बसवण्याची भन्नाट आयडिया मांडल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रुग्णवाहिकेच्या सायरनचाही आवाज बदलणार असल्याचे सांगितले.
पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, “मी सर्व मंत्र्यांचे हॉर्न बदलले, लाल दिवे काढून टाकले. आता पोलिस आणि अॅम्ब्युलन्सचे दिवे आहेत. मी नागपुरात 18व्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहतो. रोज एक तास प्राणायम करतो, तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात की साऊंडमुळे किती त्रास होतो. मेडिकल सायन्सप्रमाणे याचा एक दुष्परिणाम होतो आपल्यावर..”
ते म्हणाले, “दवाखान्याची बिलं आपण भरतो, त्याचे कारण वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण आहे. मी आता एक ऑर्डर काढणार आहे, की जर्मन संगीतकार होता. त्याने आकाशवाणीची एक ट्यून तयार केली होती. सकाळी साडेपाच वाजता ती ट्यून वाजायची. मी ती ट्यून शोधून काढली आहे आणि मी म्हटलं अॅम्ब्युलन्सवर ही ट्यून लावा. ती कानाला चांगली वाटते.” लवकरच ही ट्यून रूग्णवाहिकेच्या सायरनमध्ये ऐकू येणार असल्याचे गडकरी म्हणाले.