डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे देशात समतेचे राज्य आले. व्यक्ती हा जन्माने नव्हे, तर कर्माने मोठा आहे, ही आपली संकल्पना राबविणार आपले संविधान सर्वांना समान अधिकार देते, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोणावळा येथे केले.
लोणावळा शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून लोणावळा नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात 2 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच 32 कोटी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र व 8 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली शहरातील कैलास स्मशानभूमी अशा एकूण सुमारे 42 कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार प्रमोद जठार, उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी, राजू बच्चे, देविदास कडू, सुधीर शिर्के, संजय घोणे, सुनील इंगुळकर, निखिल कवीश्वर, ललित सिसोदिया, नितीन आगरवाल, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, मंदा सोनवणे, जयश्री आहेर, गौरी मावकर, पूजा गायकवाड, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, “आरपीआय’चे शहराध्यक्ष कमलशील म्हस्के आदी उपस्थित होते.