मागील काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे महामंडळाने कारवाईत वाढ केली असून बुधवारी ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांत निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ९१८ झाली आहे. या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनीही कामगारांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. याच मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना राऊत म्हणाले की,’महाराष्ट्र सरकारने, माझ्या माहितीप्रमाणे कामगारांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य केल्या आहेत. कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनू नये. त्यांनी स्वतःचं, कुटुंबाचं, राज्याचं आणि एसटीचं हित पाहावं, असं आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे आणि ह्या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे विश्वास ठेवावा असं व्यक्तिमत्व आहे.’