वर्धा: समुद्रपूर तालुक्यातील नगर पंचायतीच्या सर्व प्रभागातील म्हणजे १ ते १७ वार्डातील निवडणुका मागील टप्प्यात पार पडल्या. परंतु ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्या कारणाने प्रभाग क्र ७ व ८ या वार्डातील निवडणूक लांबणीवर गेली होती. समुद्रपूर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उर्वरीत दोन प्रभागातील निवडणूक दि. १८ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सांयकाळी ५.३० पर्यंत आहे. त्यासाठी नगर पंचायत समुद्रपूर सार्वत्रिक निवडणूक विभागामार्फत नेमणूक केलेल्या मतदान अधिका-यांनी आज मतदानाचे सर्व साहित्य तहसिल कार्यालय येथून तपासणी करून नेमून दिलेल्या बूथवर रवाना झाले. समुद्रपूर नगर पंचायतीच्या प्रभाग ७ व ८ मधून एकूण पाच उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे.
नगर पंचायत समुद्रपूर येथील दोन वार्डातून अशोक डगवार, संदीप गरडे, अमित वासनिक, योगिता वंजारी आणि सुषमा बेलेकर हे पाच उमेदवार निवडणूक लढवित असून नागरिक उद्या यांचे भवितव्य ठरवणार आहे. पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.