वर्धा: समुद्रपूर तालुक्यातील जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा, सायगव्हाण येथील १२ ते १४ वय वर्ष पूर्ण झालेल्या मुला मुलींना ‘कार्बोव्हैक्स’ चा पहिला डोस आज दि. २३ मार्च रोजी दुपारी शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने मुख्याध्यापक पाटील आर जी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
जिल्हा परीषद वर्धा आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड व उपकेंद्र पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विभागाची टीम जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा सायगव्हाण येथे दुपारी दाखल झाली. वय वर्ष १२ पूर्ण झालेल्या मुला मुलींची यादी तयार करून अपडेट आधार कार्डासह पालकांना बोलावण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सक्रीय सहभाग घेऊन मदत केली. शा व्य स चे सदस्य अतुल आडकीने, जरीले, उषाताई क्षीरसागर, सोनवणे ताई, आदींनी सहकार्य केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड येथील डॉ चेतन आडे, आरोग्य सेविका भारती मून, आशासेविका सीमा वानखेडेव रूपाली सातक यांनी ‘कॉर्बव्हैक्स’चा पहिला लसीचा डोस मुला मुलींना दिला. शाळेतील वर्ग ६ व ७ वीच्या मुला मुलींना पहिला डोस त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत देण्यात आला.
याप्रसंगी लसीकरणानंतर डॉ चेतन आडे यांनी पालक व विद्यार्थ्यांना लसीकरणाचे फायदे यावर मार्गदर्शन केले. २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येणार असल्याचेही डॉ आडे यांनी यावेळी सांगितले. आज पिंपळगाव उपकेंद्रांतर्गत आदर्श विद्यालय, केंद्र शाळा पिंपळगाव व सायगव्हाण येथे लसीकरण मोहिम राबविण्यात आल्याचेही याप्रसंगी डॉ. आडे यांनी सांगितले. सायगव्हाण येथील पालक, नागरिक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व मुख्याध्यापक पाटील यांचे आरोग्य विभागाच्या वतीने आभार मानले.