जालना शहरातील परतूर तालुक्यांतर्गत असलेल्या येनोरा येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत, यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारला आवाहन केले आहे.
संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाजातील तरूण मुख्य प्रवाहातून बाहेर पडला आहे. या तरूणांना सक्षम करण्यासाठी आम्ही समाजाच्या वतीने शासनाकडे आरक्षणासह सारथी संस्था, आण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून उच्चशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व व्यवसाय उपलब्धता यांसारख्या इतर अनेक मागण्या केलेल्या आहेत. त्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलने केली. मात्र शासनाकडून त्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. वेळोवेळी समाजाच्या पदरी निराशाच पडत आहे.
आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरूण नैराश्यात जात आहे. त्या न्यूनगंडातूनच आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. देशाचे भविष्य असणारी तरूण पिढी अशा परिस्थितीत जाणे, हे राष्ट्रास अहितकारक आहे.