भंडारा जिल्ह्यातील इतिहासकालीन असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या (मनरो) पटांगणात दुकान गाळ्यांचे बांधकाम थांबविण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून तसेच शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. ही एक ऐतिहासिक वास्तू असून या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. तसेच शाळेच्या पटांगणात बांधकाम केल्यास सगळे वैभव जाईल. त्यामूळे सदर बांधकामाला मोठ्या प्रमाणात सामाजिक संघटना, काही पक्ष तसेच शाळेचे आजी-माजी विद्यार्थ्यांचा विरोध दिसून येत होता. शाळेच्या पटांगणातील बांधकाम थांबावे याकरिता भंडाऱ्यातील कलेक्टर ऑफिस समोर माजी विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. सध्या या बांधकामावर कोर्टाकडून स्टे ऑर्डर मिळाला आहे. मनरो शाळेतील पटांगणातील बांधकामाविषयी मनरो शाळेतील प्राध्यापिका बोकडे यांना विचारले असता त्यांनी याविषयी बोलणे टाळले.
मनरो शाळेच्या पटांगणात गाळे बांधण्याचे काम सुरु होते. जवळपास २००० विदयार्थी सध्या मनरो शाळेत शिक्षण घेत आहे. या शाळेत बारावीपर्यंत शिक्षण घेता येते. मनरो शाळेची स्थापना १९१२ साली झाली असून, ही शाळा ११५ वर्ष जुनी शाळा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोटनिवडणुकीत उभे होते तेव्हा याच शाळेच्या प्रांगणात त्यांनी भाषणे केली होती. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे देखील भाषणे इथे झाले होती. १९४२मध्ये भारत छोडो आंदोलनात भाषणे दिली होती. भंडारा जिल्ह्यात भारतीय स्वतंत्रचा पहिला झेंडा या शाळेत फडकला. शाळेची इमारत ही इंग्रजांच्या काळात बांधलेली आहे. तिचे बांधकाम हे अगदी भक्कम आहे. शाळेसमोरील पटांगणात बांधकाम केल्यास ऐतिहासिक वसा नष्ट होईल. तसेच शाळेला मैदान राहणार नाही. आरटीइ अंतर्गत शाळेला जितके पटांगण असायला हवे तेहि बांधकाम केल्यावर राहणार नाही.
भंडारा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रिकाम्या जागांवर अतिक्रमण होऊ नये व जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी याकरिता सन २०१८ मध्ये भंडारा जिल्हा परिषदेने ठराव घेत जि.प च्या जागांवर व्यवसायिक गाळे उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र घेण्यात आलेल्या ठरावामध्ये भंडारा शहरातील मनरो शाळा परिसरात व्यावसायिक गाळे बांधण्याचा उल्लेख नसल्याची माहिती असून त्या ठरवाविषयी साशंकता आहे. तसेच याविषयीची निविदा प्रक्रिया पार पाडतांना नियमांकडे दुर्लक्ष केल्या गेले आहे. मनरो शाळेतील पटांगणातील बांधकामाविषयी मनरो शाळेतील प्राध्यापिका बोकडे यांना विचारले असता त्यांनी या विषयी बोलणे टाळले.