नागपूरमधील महिला डॉक्टर देवकी बोबडे यांच्या हत्याकांडाचा नंदनवन पोलिसांनी छडा लावला आहे. खुर्चीला हात-पाय बांधून गळा चिरत वृद्ध महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तीन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. 78 वर्षीय देवकी जीवनदास बोबडे यांच्या नातवानेच आजीची हत्याचा केल्याचा आरोप आहे.
नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मीतेश पाचभाई असे आपल्या सख्ख्या आजीची हत्या करणाऱ्या आरोपी नातवाचे नाव आहे. पोलिसांनी मीतेशला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
शनिवार 27 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास देवकी बोबडे राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्या घरात एकट्या असताना आरोपी घरात घुसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. आधी देवकी बोबडे यांचे हात पाय खुर्चीला बांधण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांनी आरडा ओरडा करु नये, या उद्देशाने त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता. अखेर गळा चिरुन त्यांची हत्या केल्याचं समोर आलं होतं.
हत्येचं कारण अस्पष्ट
चोरी किंवा लूटमार करण्याच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय आधी व्यक्त केला गेला होता, मात्र घरातील साहित्य जसंच्या तसं असल्याने अन्य कारणास्तव हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु नातवाने आजीची हत्या नेमक्या कोणत्या कारणास्तव केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
घराच्या पहिल्या मजल्यावर मुलगी-जावई
78 वर्षीय देवकी बोबडे या डॉक्टर होत्या. नागपूरच्या नंदनवन परिसरात गायत्री कॉन्व्हेंटजवळ असलेल्या घराच्या तळ मजल्यावर त्या पतीसह राहत होत्या. त्यांची मुलगी आणि जावई सुद्धा त्याच घराच्या पहिल्या मजल्यावर राहतात. देवकी यांचे वृद्ध पती जीवनदास बोबडे हे अर्धांगवायूने आजारी आहेत.
नागपूर शहरातील नंदनवनसारख्या गजबजलेल्या भागात शनिवारी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत या हत्या प्रकरणाचा छडा लावला आहे.