नागपूर: नागपूर शहरातील कचर्याच्या समस्येकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर सिटिझन्स फोरमने रविवारी अनोखे आंदोलन केले. महापौर व आयुक्तांचा मुखवटा घालून शहरातील 75 कचरा ढिगार्यांसमोर लाल फित कापून या ढिगार्यांचे उद्धाटन करण्यात आले. याप्रसंगी सिटिझन्स फोरमचे पदाधिकारी अभिजीत झा,अमित बांदूरकर, वैभव शिंदे पाटील, प्रतिक बैरागी,हर्ष मते इत्यादी सदस्य उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेने शहरास “बीन फ्री सिटी” म्हणजेच “कचरापेटी मुक्त शहर” घोषित केले आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती काही वेगळीच आहे. पूर्वी वस्त्यावस्त्यांमध्ये कचरा संकलनासाठी ज्या कचरा पेट्या किंवा मोठे कंटेनर होते ते काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे जागोजागी कचर्याचे ढीग साचल्याचे पहायला मिळते. अनेक वस्त्यांमध्ये कचरा गाड्या नियमित येत नसल्यामुळे लोकांना नाईलाजाने कचरा टाकावा लागतो. ओल्या कचर्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. या अस्वच्छतेमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिटीझन्स फोरमने रविवारी पश्चिम नागपुरातील पोलीस लाईन टाकळी, उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती नगर, मध्य नागपुरातील रेल्वे स्टेशन व काॅटन मार्केट परिसरात हे प्रतिकात्मक आंदोलन केले. फोरमने कचर्याचे ढीग जमा होणारे शहरातील 75 स्पाॅट शोधून त्याठिकाणी हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे. रविवारपासून या अभियानाला सुरुवात झाली आहे.
नागपूरची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असल्याचा दावा महानगरपालिका करते. याचवेळी स्वच्छ व सुंदर शहराचा ठेंबा ही मिरवला जातो मात्र हा दावा किती फोल आहे हे वस्त्यावस्त्यांमधील कचर्याच्या ढिगार्याकडे पाहिल्यावर लक्षात येत असल्याचे. बीन फ्री सिटी हे एक मोठे थोतांड असून हा जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. नियमित साफसफाई व कचरा संकलन झाले तर अशा प्रकारे कचर्याचे ढीग जमा होणार नाहीत. महापालिका प्रशासन व पदाधिकार्यांनी संवेदनशीलता दाखवून ही समस्या मार्गी लावण्याची गरज असल्याचे झा म्हणालेत.
निवेदन, अर्ज, विनंत्या करुन कचर्याची समस्या सुटत नसल्यामुळे नाइलाजाने आम्हाला अशा प्रकारचे आंदोलन करावे लागत असल्याचे फोरमने म्हटले आहे.
महानगरपालिका प्रशासन व पदाधिकार्यांनी हा विषय गांभिर्याने घेतला नाही तर येत्या काळात ज्या ज्या ठिकाणी कचरा दिसेल त्याठिकाणी पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवकांच्या नावाने त्या जागेचे नामकरण करण्याचा इशारा नागपूर सिटीझन्स फोरमने दिला आहे.