मुंबई :- राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार आहे. आपल्या ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल, महाराष्ट्राची जनता हे पाहतेय. राज्यसभा निवडणुकीत आतापर्यंतचा सर्वात मोठा घोडेबाजार होणार असल्याचा गंभीर आरोप वंचित च्या प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन रणसंग्रामाला सुरुवात झाली असून सहावा उमदेवार शिवसेनेचा आणि भाजपाचा देखील आहे. साखर कारखानदारी आणि सहकार क्षेत्राचा अभ्यास असलेले राष्ट्रवादीचे यापूर्वीचे खासदार भाजपाचे सहावे उमेदवार आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या (NCP) गडाला भगदाड पाडण्याचा जोरकस प्रयत्न भाजपाने चालवलेला आहे.
धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीमुळे प्रत्यक्षात भाजपा-शिवसेनेतील ही लढत राष्ट्रवादी विरूद्ध भाजपा (BJP) अशी झाली आहे. म्हणजेच, राष्ट्रवादीला स्वत:चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा (Shiv Sena) उमेदवार निवडून आणावा लागेल, असे सूचक विधान आंबेडकर यांनी केले आहे.
“राष्ट्रवादीला स्वत: चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांना निवडून आणावा लागेल. तो उमेदवार निवडून न आल्यास भाजपाने राष्ट्रवादीच्या गडात प्रवेश केला असे म्हटले जाईल. केंद्राच्या हातात इथेनॉलचे लायसन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचं लालूच दाखवून ते त्यांना भाजपाकडे घेतील आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडतील अस या निवडणुकीत घडू शकते.”
प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी