राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन डोस घेतलेल्यांची संख्या, आता 2 कोटींच्या पुढे गेली असून, या बाबत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत, राज्यात दुसरी मात्रा मिळालेल्यांची संख्या, 2 कोटी 6 लाख 73 हजार 908 झाली होती. पहिली मात्रा देण्यात मात्र, उत्तर प्रदेश महाराष्ट्रापेक्षा पुढे आहे. महाराष्ट्रात 5 कोटी 27 लाख 66 हजार 279, तर उत्तर प्रदेशात, 7 कोटी 75 लाख 46 हजार 189 जणांना पहिली मात्रा देण्यात आली आहे.
एकंदर लसीकरणात महाराष्ट्राला मागे टाकणाऱ्या उत्तर प्रदेशानं आपली आघाडी कायम राखली आहे. उत्तर प्रदेशात पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकंदर 9 कोटी 42 लाख 9 हजार 219 मात्रा देण्यात आल्या महाराष्ट्रात देण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रांची मिळून एकंदर संख्या 7 कोटी 34 लाख 40 हजार 187 आहे. देशभरात आतापर्यंत लसीच्या दोन्ही मिळून एकंदर 81 कोटी 73 लाख 95 हजार 763 मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान लसीकरणानंतरही कोरोनाची बाधा झाली तरी ती कमी घातक असते असं आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेली आकडेवारी सांगते. ज्यांनी लस घेतलेली नाही अशा कोविड रुग्णांच्या तुलनेत पहिली मात्रा घेतलेल्या रुग्णांमधला मृत्यूदर साडे शहाण्णऊ तर दुसरी मात्रा घेतलेल्या कोविड रुग्णांमधला मृत्यूदर साडे सत्त्याण्णव टक्क्यांनी कमी आहे.