ऑफ्रिकेतून मुंबईत दाखल झाले 87 जण, त्यातील दोघे पॉझिटिव्ह
संपूर्ण जगाची धाकधुक कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा वाढवली आहे. जगभरातील सर्वच देशांनी दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सरकारकडून मुंबईसह राज्यात या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. दुसरीकडे मुंबईत आफ्रिकेतून 87 जण दाखल झाल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली असून या सर्वांना ट्रेसिंग करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यातील डोंबिवलीमधील दोघे कोरोनाबाधित आले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पण ओमिक्रॉनची लक्षणे या दोघांमध्ये आहेत की नाही याची टेस्ट अद्याप बाकी आहे.
याबाबत माहिती देतान महापौरांनी सांगितले की, आता सगळ्यांनीच ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सतर्क होण्याची गरज आहे. कोविड सेंटर सज्ज असून आता ते पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करावे लागणार आहेत. डॉक्टर , नर्स स्टाफ आपल्याकडे आहेत. विमानतळाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे त्या म्हणाले. बाहेर देशातून आलेल्या व्यक्तींची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कुटुंबियांची चाचणी केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. जगभरातील सर्वच देश ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकन देशांतून उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.