सध्या घडीला महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र, या तिन्ही पक्षांतील नेत्यांत कुरबुरी असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत आणि यावरुन महाविकास आघाडी सराकरमध्ये सर्वकाही आलबेलं नसल्याचं बोललं जात आहे. यावरुन भाजपा नेते आशिष शेलार निशाणा साधला आहे.
शेलार म्हणाले राज्यातील सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असलेले सरकार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस हा घोटाळेबाज, काँग्रेस हा झोलबाज आणि शिवसेना हा दगाबाज असे हे तीन पक्षांचं राज्यातील सरकार आहे. सेनेने मोदींचा फोटो वापरून निवडणुकीत यश मिळवले. निवडणूक संपल्यानंतर दगेबाजी केली. त्यामुळे शिवसेना हा पक्ष दगाबाजच असणार अशी खरमरीत टीका आशिष शेलारांनी केली.
‘जेव्हा केव्हा मावळच्या विधानसभेची निवडणूक होईल, तेव्हा इथे लिहिल्याप्रमाणे आपलं मावळं, आपलं कमळंच होईल. याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. ज्या पद्धतीने तीन पक्षांमध्ये आपापसात विसंवादाची रोज लढाई लागली आहे आणि त्या तीन पक्षातल्या दोन पक्षांचे जे संकेत आम्हाला येतायत. या सगळ्याचा अभ्यास केला तर अनुमान असा काढता येऊ शकतो की, निवडणूक केव्हाही लागू शकेल’, असं मोठं विधान आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्या दरम्यान केलं.