नागपूर: नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्र परिसरातील भारतीय व्यवस्थापन संस्था- आयआयएम- नागपूरचा दीक्षांत सोहळा 24 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.45 वाजता होणार असून आयआयएम नागपूरच्या नव्या परिसराचे उद्घाटन 8 मे 2022 ला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भिमराया मैत्री यांनी आज नागपूर मध्ये दिली याप्रसंगी दृश्य प्रणालीद्वारे आयआयएम नागपूरचे अध्यक्ष सी. पी. गुरुनानी उपस्थित होते.
नागपूरमध्ये राष्ट्रपतींचा पूर्व नियोजित दौरा 23 एप्रिल रोजी होता परंतु काही अपरिहार्य कारणास्तव हा दौरा पुढे ढकलण्यात आल्या असून आयआयएम नागपूरच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती 8 मे रोजी येणार असल्याची माहिती सी.पी. गुरनानी यांनी दिली.
2015 पासून आयआयएम ही संस्था नागपूरात कार्यरत असून करोना साथीमुळे गेली दोन वर्ष दीक्षांत सोहळा होऊ शकला नाही . त्यामुळे 24 एप्रिल रोजी आयोजित आयआयएमच्या चौथ्या पाचव्या आणि सहाव्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याच्या प्रसंगी एकूण 424 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असून याप्रसंगी लार्सन अँड टर्बो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस एन सुब्रमण्यम उपस्थित राहणार आहेत .