नागपूर: राज्याची उपराजधानी म्हणून ओळख असलेल्या ‘संत्रा नगरी’तील तब्बल बारा रस्ते असलेल्या व आशिया खंडातील क्रमांक दोनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय असलेल्या दक्षिण नागपूर परीसरातील ‘मेडीकल चौक’ येथील आपण पहात असलेल्या चित्रात संध्यासमयी पाण्यात पडलेले स्वच्छ शहरातील स्वच्छ दुकानाचे प्रतिबिंब. ही दृश्य पाहून आश्चर्य नक्कीच होईल. कारण ‘स्वच्छ नागपूरची कहाणी कथन करणारे गटाराचे पाणी भर चौकातील रस्त्यावर मागील पाच दिवसापासून साचलेले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रवेश द्वार असलेल्या काही अंतरावर रस्त्याअंतर्गत पाईप लाईन फुटली असून त्याचे घाण पाणी मागील पाच दिवसापासून वाहत आहे. मेडीकल रुग्णालयात दररोज शेकडो रूग्ण उपचारासाठी येत असतात. मेडीकल चौक परीसरात तब्बल ३५ औषध विक्रेत्यांची दुकाने आहे. हजारो नागरीक या चौकात औषधासाठी येत असतात. तसेच या चौकाला तब्बल बारा रस्ते असून नेहमीच वर्दळ कायम दिसून येते.
गटाराचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहन चालकांना, दुचाकीस्वारांना या घाण पाण्यातून वाट काढावी लागत आहे. वेगात आलेल्या वाहनाने पाण्यातून वाहन काढले तरी, इतरांच्या अंगावर या घाण पाण्याचे फवारे अर्थातच न्हाऊ घालून जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या परीसरात मोठी बाजारपेठ असल्याने येथील दुकानदार व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.
सायंकाळच्या सुमारास मेडीकल चौक येथील दुकानदारांशी याबाबत चर्चा केली असता हनुमान नगर झोन येथे तक्रार दिली असल्याचे प्रतिनिधीस सांगितले. परंतु अद्याप या सांडपाण्याची व उघडे पडलेल्या गटाराची दुरुस्ती करण्यासाठी कुणीही महापालिकेचे कर्मचारी आले नसल्याचे त्यांनी सांगितले. परीसरातील नागरिकांच्या आरोग्याची महापालिकेस चिंता नसल्याचे फ्रूट विक्रेत्यांनी सांगितले.
स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर फक्त नावापुरतेच आहे का? असाही सवाल परीसरातील अनेकांनी बोलून दाखवला. या गटारातील घाण पाण्याची पाईप लाईन त्वरीत दुरुस्त करावी अशी मागणी दुकानदार व नागरीकांनी केली आहे.