कोरोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. याच कोरोनामुळे ताडोबामधलं पर्यटन देखील प्रभावित झालं होतं. मात्र आता ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला झाला. पहिल्याच दिवशी पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि प्राण्यांनीही तेवढ्याच आनंदानं पर्यटकांना दर्शन देऊन मुग्ध केलं.
या पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांच्या रोजगारावरही त्याचा परिणाम झाला होता. त्यातच पावसाळ्यामध्ये हा प्रकल्प बंद होता. त्यामुळे वन्य जीव प्रेमींसह या पर्यटनावर अवलंबून असलेले घटकही हा प्रकल्प सुरू होण्याची आतुरतेने वाट बघत होते. अखेर कोरोना संबंधी सर्व काळजी घेत काल सकाळी ताडोबाच्या गाभा क्षेत्रात पहिल्या फेरीला प्रारंभ झाला. आणि पहिल्याच दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळाली.
विशेष म्हणजे या संपूर्ण महिन्याची आणि पुढच्या महिन्याचीही नोंदणी पर्यटकांनी आधीच करून ठेवली आहे. काल पहिल्याच सफारीत विविध प्राणी-पक्षी, हिरवंगार जंगल आणि मुख्य म्हणजे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या पट्टेदार वाघाचं मनसोक्त दर्शन झालं. त्यामुळे पर्यटक तर खुश आहेतच; त्याचबरोबर पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक क्षेत्रांमध्येही उत्साह दिसत आहे.